सागर जगदाळे
भिगवण : इंदापुर तालुक्यातील अगोती येथील मीना शिवाजी राऊत-घनवट यांनी मलेशिया येथे संपन्न झालेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सु्वर्ण पदक मिळवत महाराष्ट्रासह देशाची मान उंचावली आहे. राऊत-घनवट यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे इंदापुर तालुक्यासह राज्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. जागतिक योगा स्पोर्टस् फेडरेशन यांचे वतीने मलेशिया येथील कौलालंम्पुर येथे आठव्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
योगा स्पोर्टस्, रिदमिक योगा व आर्टिस्टिक योगा या तीन प्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेमध्ये जगभऱातील ६२ स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील इंदापुर तालुक्यातील अगोती येथील मीना शिवाजी राऊत-घनवट यांनी ४० ते ५० वयोगटांमध्ये योगा स्पोर्टस या प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली.
मिना राऊत-घनवट यांना महाराष्ट्र योगा फेडरेशनचे महाव्यवस्थापक सुरेश गांधी यांचे मार्गदर्शन लाभले. राऊत यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल इंदापुर तालुक्यासह महाराष्ट्रामधुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
मीना राऊत-घनवट म्हणाल्या, मी एक गृहिणी आहे. परंतु योगाबद्दल आवड निर्माण झाली. सर्वप्रथम स्वतःच्या आरोग्यासाठी योग करत असताना योग प्रशिक्षण यांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे जागतिक स्पर्धेसाठी तयारी केली. त्यामध्ये योग्य सादरीकरण केल्यामुळे सुवर्णपदकाला गवसणी घालता आली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी वडील वसंत राऊत, सासरे लक्ष्मण घनवट, पती शिवाजी घनवट व मुले यांचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले त्यामुळे हे यश मिळवु शकले. यामुळे प्रौढ स्त्रियांना योग करण्यासाठी व स्वतःचे आरोग्य सुव्यवस्थित ठेवण्यासाठी निश्चित प्रेरणा मिळेल असे वाटते.