पुणे : पुणे महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या वाघोली (ता. हवेली) ग्रामस्थांकडून स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत वाघोलीचे माजी सरपंच संदीप सातव यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहून ही विनंती केली आहे. त्यामुळे वाघोली ग्रामस्थांकडून देखील वाघोलीसाठी स्वतंत्र नगरपालिका निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सन २०१७ मध्ये पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश करण्यात आला होता. यामध्ये उरुळी देवाची आणि फुरसुंगी या सह ११ गावांचा समावेश होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात समाविष्ट झालेल्या नवीन ११ गावांपैकी २ गावांसाठी महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेत उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावं पुन्हा पुणे महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या दोन गावांना पुणे महापालिकेतून वगळण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
वाघोलीसह अन्य २३ गावांचा समावेश झाला. मात्र, कोणत्याही सुविधा नसताना महापालिकेच्या मिळकत ‘कराला’ समाविष्ट गावांचा विरोध आहे. तर सर्वच खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे ‘अर्थ’कारणाकडे लक्ष असून जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या तुलनेत वाढीव दराने ‘कर’ आकारणी होत असून त्या तुलनेत गावांना सोयी-सुविधा मिळत नसल्याची ओरड या गावांची होती. यामुळे आता वाघोलीतील ग्रामस्थांकडून देखील स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी जोर धरू लागली आहे, या संदर्भात वाघोली ग्रामस्थांकडून लवकरच विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे.