कोल्हापूर : “मागच्या वेळी वाचलास” काय वाट्टेल ते झाले तरी आम्हाला येथे “शुभांगीची जागा निवडून येणे गरजेचं आहे, जर शुभांगीचं काय झालं तर वाईट परिणाम होणार, एवढंच सांगतो” असे प्रक्षोभक वक्तव्य माजी आमदार दिनकर जाधव यांचे पुत्र विश्वजीत जाधव यांनी केले. यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून त्याची पत्नी शुभांगी जाधव यांची उमेदवारीला भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माजी आमदार दिनकर जाधव यांची सून असलेल्या शुभांगी विश्वजीत जाधव या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्याच्या तिरवडे-कुडतरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. १३ डिसेंबर रोजी विश्वजीत जाधव यांनी कोणतीही परवानगी ना घेता बेकायदेशीररित्या तिरवडे येथील लोकांचा जमाव करून सभा घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना त्यांनी धमकी दिली, अशी तक्रार माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली. त्याबरोबरीने विश्वजीत जाधव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.
या धमकीमुळे मतदारांच्या मनात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून सदरचा प्रकार अतिशय गंभीर असल्याची प्रतिक्रिया माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर यांनी दिली आहे. तसेच यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून विश्वजीत जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नांदेकर यांनी कोल्हापूरच्या पोलीस अधिकक्षकांकडे केली आहे.