सातारा : “औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना रोखून ठेवले होते, पण शिवाजी महाराज स्वराज्यासाठी बाहेर पडले, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कोणीतरी रोखले होते, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले,” असे वक्तव्य पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आणि महापुरुषांवरून केलेल्या टिपणीची वाद पुन्हा एकदा उफाळून आला.
प्रतापगड येथे आज शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंगल प्रभात लोढा बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या सुटकेशी केंद्रीय पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी करताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत असून यावरून पुन्हा राजकारण पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा विषय ताजा असताना यात अजून एका मंत्र्यांने भर घातली आहे.
मी तुलना प्रसंगाशी केली, महाराजांशी नाही : लोढा यांचे स्पष्टीकरण
पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्याने गहजब मजला असताना त्यावर लोढा यांच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली नसून जो प्रसंग घडला आहे, त्याच्याशी तुलना केली आहे. केवळ त्या प्रसंगातील साधर्म्य दाखविण्याचा माझा प्रयत्न होता, असे मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.