लोणी काळभोर (पुणे)- पुणे-सोलापुर महामार्गावरील आर्थिकदृष्ट्या संपन्न समजल्या जाणाऱ्या व हवेलीसह संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या पुर्व हवेलीमधील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणधुमाळीस उद्या (28 नोव्हेंबरपासून) सुरुवात होणार आहे. निवडणुकीसाठी उद्या सोमवार (28 नोव्हेंबर) ते शुक्रवार (2 डिसेंबर) या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
कदमवाकवस्तीचे “सरपंच”पद यंदा “इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव” असुन, मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे यंदाही सरपंच हा थेट जनतेतुन निवडला जाणार आहे. “सरपंच” पद यंदा “इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव” असले तरी, सरपंचपदाचे उमेदवार हे काळभोर व गायकवाड या दोन घरातुनच असल्याचे संकेत मिळत आहेत. या संकेतानुसार ही निवडणुकही मागील निवडणुकीप्रमाणेच चर्चेत राहणार, हे नक्की झाले आहे.
कदमवाकवस्तीच्या विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी मागील पाच वर्षात केलेल्या कामाच्या जीवावर पुन्हा एकदा ग्रामपंचायतीची सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली असुन, मागील काही महिन्यापासूनच त्यांनी निवडणुकीची पुर्व तयारी सुरु केली आहे.
तर विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड यांच्या पॅनेलला शह देण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदु काळभोर, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर, ऋुषी काळभोर यांनी देखील प्रयत्न सुरु केले आहेत. विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर यांनी सरपंचपदासाठी, त्यांची पत्नी कल्पना काळभोर यांची उमेदवारी जाहीर करुन, निवडणुकीच्या रणागणांत सुरुवातीला तरी आघाडी घेतली आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीत एकुन सतरा सदस्य असुन, ग्रामपंचायतीवर मागील पाच वर्षापासुन विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड यांच्या गटाचे निर्वीवाद वर्चस्व राहिले आहे. पाच वर्षापुर्वी गौरी गायकवाड या थेट जनतेतुन मोठ्या मताधिक्क्याने सरपंच म्हणुन निवडुन आल्या होत्या. मागील पाच वर्षाच्या काळात ९० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेसह अनेक कोटींची कामे मार्गी लागलेली आहेत. या विकास कामांच्या जोरावर गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड यांनी सलग दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यासाठी पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे.
गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड यांनी आपल्या गटाचा सरपंचपदाचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नसला तरी, सरपंचपदाचा उमेदवार त्यांच्याच घरातील असण्याची चर्चा सुरु आहे. मागील पाच वर्षाच्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा विरोधकांना धुळ चारु असा विश्वास गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड यांनी “पुणे प्राईम न्यूज” शी बोलताना व्यक्त केला आहे.
दरम्यान, विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व चित्तरंजण गायकवाड यांच्या गटातुन सत्ता हिसकावून घेण्यासाठी माजी सरपंच नंदु काळभोर, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर, ऋुषी काळभोर यांनी प्रयत्न सुरु आहेत. वरील तीनही नेते एकत्र येणार की स्वतंत्र लढणार यावर सत्तेची गणिते अवलंबून आहेत. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माधवअण्णा काळभोर व प्रतापअण्णा गायकवाड यांच्या भुमिकेवर कदमवाकवस्तीच्या निवडणुकीचे मूलभूत गणिते बदलणार असल्याने, वरील दोन्ही मात्तब्बर नेते कोणती भुमिका घेतात, याकडे कदमवाकवस्तीच्या जनतेचे लक्ष लागले आहे.
निवडणुक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
१) उमेदवारी अर्ज स्विकारण्याची तारीख – सोमवार 28 नोव्हेंबर ते शुक्रवार 2 डिसेंबर
२) अर्जाची छाननी – सोमवार 5 डिसेंबर
३) अर्ज मागे घेण्याचा अंतीम दिवस- बुधवार 7 डिसेंबर
४) चिन्ह वाटप – बुधवार 7 डिसेंबर
५) मतदान – रविवार 18 डिसेंबर रोजी
६) मतमोजनी- मंगळवार 20 डिसेंबर..