Bhigvan News भिगवण : महाराष्ट्रात मराठा महासंघ ही संघटना अत्यंत जुनी असून, स्वर्गीय आमदार आण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी 1982 साली प्रथम स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर मोर्चा काढलेला होता. त्यात आता मराठा महासंघाची ‘गाव तेथे शाखा’ मोहीम तळागाळापर्यंत पोहचवणार असल्याची ग्वाही अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप यांनी दिली. (Bhigvan News)
मराठा आरक्षणासाठी राज्यात 1982 मध्ये मंत्रालयावर निघालेल्या मोर्चात अण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिले. त्यांचे ते प्रथम बलिदान होते. या मोर्चाला संबोधित करताना स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी भीष्मप्रतिज्ञा घेतलेली होती की जर शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही. त्यानुसार, त्यांनी समाजाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी 23 मार्च 1982 रोजी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले होते.
तसेच मराठा महासंघ ही संघटना त्यांनी स्थापन केली आहे. त्यानंतर मराठा महासंघाची धुरा समाजामधील अनेक मान्यवरांनी पेलवली व सध्या राजेंद्र कोंढरे हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अत्यंत सक्षमपणे काम करत आहेत. मराठा महासंघ ही महाराष्ट्र राज्यामध्ये काम करत असताना कोणत्याही समाजाच्या अथवा धर्माविरोधी किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ अथवा विरोधी काम करत नाही. फक्त मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणारी संघटना मातृसंस्था आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.