(Amol Kolhe) लोणी काळभोर, (पुणे) : दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाल्याचा नक्कीच आनंद आहे. पण हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही तर, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील तमाम मायबाप मतदारांचा आहे. त्यामुळे यापुढेही जनसामान्यांचे प्रश्न व मुद्दे लोकसभेत मांडण्याची जबाबदारी मी नक्की निभावेन अशी विनम्र प्रतिक्रिया पुन्हा एकदा संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी व्यक्त केली आहे.
दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार…!
आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार पटकावणाऱ्या खासदार कोल्हे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण, मुद्देसूद आणि आवेशपूर्ण भाषणांनी लोकसभा नेहमीच गाजवली. शेतकऱ्यांचे प्रश्न असो वा मतदारसंघातील रेडझोनचा. बैलगाडा शर्यतींचा विषय असो किंवा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा, खासदार डॉ. कोल्हे यांनी प्रत्येक विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करीत संसदेचे लक्ष वेधून घेत आपला ठसा उमटवला आहे.
एरवी विरोधी पक्षातील खासदार बोलायला उभे राहिले की गोंधळ घालणारे सदस्य डॉ. कोल्हे यांची भाषणं लक्षपूर्वक ऐकताना दिसतात. त्यांच्या भाषणाची दखल खुद्द पंतप्रधान मोदी यांनी घेतली ही त्यांच्या संसदेतील कामगिरीला मिळालेली पावतीच म्हणता येईल. मतदारसंघातील एखादा विषय बराच काळ प्रलंबित राहतोय हे पाहिल्यावर खासदार डॉ. कोल्हे यांनी संसदेत आवाज उठवायचा आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी लगेचच त्यांना भेटीसाठी बोलावून प्रश्न समजून घ्यायचा हे सातत्याने घडताना दिसते.
अगदी बैलगाडा शर्यत बंदी संदर्भात संसदेत बोलताना देशी बैलांचा वंश धोक्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करताच दुसऱ्याच दिवशी पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांनी त्यांना भेटीसाठी निमंत्रित केले. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मुद्दा उपस्थित करताच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लागलीच बैठक घेत प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिली, हे खासदार डॉ. कोल्हे यांचं कसब म्हणता येईल. विरोधी पक्षाचा खासदार असतानाही शिरुर लोकसभा मतदारसंघातील जवळपास ३० हजार कोटींचे राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प मंजूर झाले आहेत.
आपल्याला मिळालेल्या संसदरत्न पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, शिरुर लोकसभा मतदारसंघातील मायबाप मतदारांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा कायमच माझा प्रयत्न असतो. त्यामुळे लोकसभेत प्रभावी कामगिरी झाली पाहिजे यावर माझा कटाक्ष असतो. त्यामुळे अधिवेशन काळात भाषणांची पूर्वतयारी करण्याला माझं प्राधान्य असतं. माझ्या मार्गदर्शक व गटनेत्या सुप्रियाताई सुळे मला नेहमीच प्रोत्साहन देतात. त्यामुळे या पुरस्काराचे श्रेय मायबाप मतदारांबरोबरच त्यांनाही आहे.
संसदेत प्रभावी कामगिरी करण्याबरोबरच मतदारसंघातील महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याचे माझे प्रयत्न असतात, असे त्यासाठी सांगून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, सातत्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन सतत आढावा घेतो. त्यामुळेच नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरूर या राष्ट्रीय महामार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला रेल्वेमंत्र्यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. इंद्रायणी मेडिसिटीसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली.
दरम्यान, या प्रकल्पाला सध्याच्या सरकारने चालना द्यावी यासाठी माझे प्रयत्न आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्थेची उभारणी जुन्नर तालुक्यात व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शिवनेरीवर भगवा ध्वज, रोपवे, शिवसंस्कार सृष्टी, लेण्याद्रिसह जुन्नर तालुक्यातील लेणी समूहांचा विकास, शिवशंभू कॉरिडॉर अशा अनेक प्रकल्पांचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच हे प्रकल्प मार्गी लागतील असा मला विश्वास आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.