सुरेश घाडगे
परंडा : नगर परिषद निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून दि .१८ ऑगष्ट रोजी मतदानाचा दिवस ठरला आहे .त्यामुळे क वर्ग दर्जा असलेल्या परंडा नगर परिषद निवडणुक मतदान घटीका अवघ्या सव्वा महिन्यावर येऊन ठेपली आहे .
निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांनी निवडणुक मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे . उमेदवारी अर्ज स्वीकारणे दि .२२ जूलै ते दि .२८ , अर्ज छाननी व यादी प्रसिध्द करणे -दि .२९ , अर्ज मागे घेणे दि .४ ऑगष्ट तर मतदान दि .१८ ऑगष्ट रोजी सकाळी ७ : ३० ते ५ : ३० या वेळेत आहे .
प्रभाग रचना व प्रभागनिहाय आरक्षण सोडत झाली असून १० प्रभागातून २० सदस्य निवडून द्यायचे आहेत .यामध्ये ९ सर्वसाधारण , ८ सर्वसाधारण महिला तर ३ अनुसूचित जाती (यामध्ये २ महिला ) असे आरक्षण आहे .यावेळी नगरसेवकातून अध्यक्ष पद असल्याने सदस्य पदाला मोठे महत्व आले आहे .
परंडा शहराची १८७५८ लोकसंख्यानुसार १० प्रभाग करण्यात आलेले आहेत . प्रत्येक प्रभागातून दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत . त्यामुळे २० सदस्य संख्या झाली आहे . यापूर्वी ८ प्रभाग व १७ सदस्य संख्या होती . यामध्ये २ प्रभाग वाढवून ३ सदस्य संख्या वाढवली आहे .निवडून आलेल्या सदस्यातून बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचा अध्यक्ष होणार आहे . त्यामुळे पुन्हा नगरसेवक पदाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे .
सर्वच राजकीय पक्ष व इच्छूक कामाला लागले आहेत .इच्छूक उमेदवार पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षश्रेष्ठी ,नेते , पदाधिकारी यांची मर्जी सांभळताना दिसत आहेत .पक्षाने डावललेच तर अपक्ष निवडणुक लढविण्याची तयारी देखील अनेक उतावीळ बहाद्दरांनी ठेवलेली आहे .
शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, रिपाई, वंचित आघाडी , एमआयएम, मनसे आदि राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे .गत निवडणूक चौरंगी झाली होती . यामध्ये नगराध्यक्ष पद जनतेतून होते . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नगर अध्यक्ष पद व १७ जागांपैकी ९ जागांवर दणदणीत विजय मिळवला व शिवसेनेची सत्ता संपुष्टात आणली होती . तर शिवसेना ४ व भाजपा ४ जागांवर विजयी झाले होते . तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही .