उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश येथील एका धक्कादायक घटनेत, एका तांत्रिकाने झटपट श्रीमंत होण्याचे आमिष दाखवून 2 जणांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. तांत्रिकाने दोन जणांना विषारी लाडू खाण्यासाठी दिले जे खाल्यानंतर दोघांचा मृत्यू झाल्याहे वृत्त आहे. ही घटना फिरोजाबादमधील माखनपूर येथे घडली आहे. ठाणे क्षेत्रातील गाव गोकुल रामनाथ आणि ठाणे उत्तर येथील इंदिरानगरमधील पूरन सिंग यांना तांत्रिकाने पैशाचे आमिष दाखवून हे कृत्य केले आहे. मृत पूरन हा स्वतः तांत्रिक होता. पुरनचा गुरू कमरुद्दीन भगतगिरी याने दोघांना जमिनीत दडलेल्या सोन्याचे मोह दाखवला होता. कमरुद्दीन याने रामनाथ आणि पूरन यांना सांगितले कि, लिंबाच्या झाडाखाली आत्महत्या केल्यास जिन्न येईल आणि जमिनीतून खजाना काढून देईल.
कमरुद्दीन भगतगिरी हा तांत्रिक काळी जादू करत होता आणि यापूर्वी तांत्रिक विधीच्या नावाखाली त्याने दोघांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले होते. जेव्हा त्यांनी त्यांचे पैसे परत मागितले तेव्हा कमरुद्दीन संतापला आणि त्याने हा भयानक कट रचला.
पोलिसांनी चौकशी करून कमरुद्दीनला अटक केली, ज्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि म्हटले की, त्याने पीडितांना विषारी लाडू खाण्यास दिले होते, ज्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. तांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, तांत्रिकाच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. पीडितांचे कुटुंब आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.