नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला आहे. या हल्ल्यात भारताने दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उध्वस्त केली आहेत. या ऑपरेशन सिंदूर नंतर आता राजधानी दिल्लीसह देशभरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये, विमानतळावर, रेल्वे स्थानकासह सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी अतिरिक्त पोलीस कर्मचारी आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर देशाची राजधानी दिल्लीमध्ये देखील ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान सुरक्षा पथके महत्त्वाच्या ठिकाणी कडक नजर ठेवत असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवत आहेत. प्रमुख ठिकाणी अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.दिल्ली पोलीस पूर्णपणे सतर्क आहेत. कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल आहे.