हैदराबाद: काँग्रेसने तेलंगणामध्ये मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील. आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, आज रात्री आठ वाजता रेड्डी यांचा राजभवनात शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे.
तेलंगणात एकूण 119 जागांपैकी 64 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. बीआरएसने 39 तर भाजपने आठ जागा जिंकल्या आहेत. येथे सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही एका पक्षाला 60 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसला 39.40 टक्के, बीआरएसला 37.35 टक्के आणि भाजपला 13.90 टक्के मते मिळाली. रेवंत रेड्डी यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून भारत राष्ट्र समिती (BRS) चे पी नरेंद्र रेड्डी यांचा 32000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून रेवंत हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
विधिमंडळ पक्षाची बैठक
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेत्यांनी रविवारी (३ डिसेंबर) सायंकाळी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर सोमवारी (४ डिसेंबर) काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेतेपदी नियुक्तीसाठीचे अधिकार देण्यात आले होते.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले होते की, हे ठरावाचे पत्र खर्गे यांना पाठवले जाणार असून पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा निर्णय मान्य करण्याचा निर्णय आमदारांनी घेतला आहे. त्यांनी सांगितले की, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांनी यासंदर्भात एक प्रस्ताव मांडला आणि मल्लू भट्टी विक्रमार्का आणि डी. श्रीधर बाबू यांच्यासह ज्येष्ठ आमदारांनी त्याला पाठिंबा दिला.