नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीतील कथित अनियमिततेचे काँग्रेस पक्षाने केलेले आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी फेटाळून लावले. हरियाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप चुकीचे व तथ्यहीन आहेत. भविष्यात काँग्रेसने असे बिनबुडाचे आरोप करणे टाळले पाहिजे. मतदान व मतमोजणीवेळी बेजबाबदार आरोप केल्याने अशांतता व अराजकता माजण्याची शक्यता असते, अशा शब्दांत आयोगाने काँग्रेसला फटकारले आहे.
ऐन निवडणूक काळात संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसंबंधी काँग्रेसने ‘संशय’ निर्माण केला, असे खडेबोल निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या पत्रात सुनावले. देशातील निवडणूक व लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि ती बळकट करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये झालेल्या वैचारिक टीकेचे निवडणूक आयोगाने कौतुक केले.