उदयपूर : राजस्थानच्या उदयपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत उदयपूर पोलिसांनी तीन राज्यातील तरुणांच्या टोळीला अटक केली आहे. ही टोळी मुलांना गर्लफ्रेंड तर मुलींना बॉयफ्रेंड ऑफर करायची. हा प्रकार पोलिसांना कळताच पोलिसांच्या पथकाने कारवाई करत त्यांना पकडले. याप्रकरणी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील पाच तरुणांना अटक करण्यात आली आहे.
उदयपूर शहरातील गोवर्धन विलास पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एसपी भुवन भूषण यादव यांनी सांगितले की, पोलीस स्टेशन हद्दीतील बालिच कॉलनीतील एक टोळी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मुला-मुलींशी मैत्री करत असल्याची माहिती मिळाली होती. डेटचा बहाणा करून ते फसवणूकही करतात, याबाबतही पोलिसांना समजले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथे पाच तरुण आढळून आले. भानू प्रताप सिंग (रा. आग्रा, उत्तर प्रदेश), सत्यम सिंग (रा. आग्रा), राहुल व्यास (रा. करौली, राजस्थान), अमूल अहिरवार (रा. छत्तरपूर, मध्य प्रदेश) आणि मोहित सिंग (आग्रा) अशी त्यांची नावे आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून मोबाईल आणि टॅबलेटही जप्त केला आहे.
अशी फसवणूक करायचे
पोलिस चौकशीत आरोपीने सांगितले की, ते आपल्या मोबाईलवरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मुलांना गर्लफ्रेंड आणि मुलींना मुलांशी मैत्री करून बॉयफ्रेंड मिळवून देतो म्हणत फसवणूक करायचे. ते त्यांना व्हॉट्सअॅप किंवा इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवत असे, ज्यात मैत्रीचे तपशील असायचे. संदेशांमध्ये मुला-मुलींचे फोटोही होते. या सगळ्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील, पण यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल, असेही मेसेजमध्ये सांगण्यात आले होते. नोंदणीच्या नावाखाली ऑनलाइन पेमेंट करून त्यांना व्हॉट्सअॅपवर ब्लॉक करायचे.