नवी दिल्ली: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांना ईडीने समन्स बजावले होते. यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला. याला काँग्रेस घाबरणार नाही, एक दिवस भाजपलाही याचा त्रास सहन करावा लागेल, असे ते म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, “भाजपला मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची निवडणूक खराब करायची आहे. त्यांना (भाजप) काँग्रेस नेत्यांचे मनोधैर्य खचवायचे आहे आणि त्यांना घाबरवायचे आहे. ते नेहमी असेच करतात, पण आम्ही घाबरणार नाही, उलट जोरदार लढाई करणार आहोत, असे देखील खरगे यांनी म्हटलं आहे.
‘निवडणुकीत ईडीची कारवाई कधीच झाली नाही’
काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे पुढे म्हणाले की, “आम्ही ५० वर्षांपासून राजकारणात आहोत, आजपर्यंत निवडणुकीच्या वेळी कधीच ईडी आणि आयटीचे छापे पडलेले नाहीत. आज भाजप एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घाबरवण्यासाठी असे करत आहे, एक दिवस त्यांनाही (भाजप) हे भोगावे लागेल. त्रास सहन करावा लागेल. यामुळे काही लोक घाबरतील, परंतु आमचे लोक घाबरत नाहीत. सीएम गेहलोत, राजस्थान सरकारचे मंत्री आणि कार्यकर्ते धैर्याने लढतील.” असंही ते म्हणाले.
राजस्थानमध्ये ईडीची कारवाई
ईडीने सीएम अशोक गेहलोत यांच्या मुलाला समन्स बजावत फॉरेन एक्स्चेंज व्हायलेशन (फेमा) अंतर्गत चौकशीसाठी बोलावले होते. राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंग यांच्या निवासस्थानावर देखील ईडीने छापा टाकला. यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी केंद्र सरकारवर गुंडगिरीचा आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्याचा आरोप केला.