पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी एनडीएच्या मित्रपक्षांच्या खासदारांना मंत्री बनवण्याचे फोन येऊ लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 40 जणांना मंत्री केले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आता पंतप्रधान कार्यालयातून सकाळपासून मंत्र्यांना फोन केले जात आहे. मोदी 3.0 सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे एनडीएतील मंत्रीपद दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन केले जात आहे. त्यात राजनाथ सिंह, जीतन राम मांझी, जयंत चौधरी, चिराग पासवान, जेडीयू नेता रामनाथ ठाकूर आणि अनुप्रिया पटेल यांना फोन आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज्यातून आज (9 जून) सकाळी दहावाजेपर्यंत तिघांना फोन आला असून यामध्ये अपेक्षेनुसार नितीन गडकरी, पियूष गोयल आणि रक्षा खडसे यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव याना संधी देण्यात आली आहे. रामदास आठवले यांनाही मंत्रिपदासाठी कॉल आला आहे. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनाही मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरु असताना अद्याप त्यांना सुद्धा मंत्रिपदासाठी कोणताही कॉल आला नसल्याचे समोर आलं आहे.
नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली आहे. अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्याशिवाय, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, जेडीयू प्रमुख नितीश कुमार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांसारख्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे. त्यानंतरच नावे फायनल झाली असून आता कॉल्स येऊ लागले आहेत. या लोकांना आजच शपथही घेता येईल.