विजयवाडा: आंध्र प्रदेशातही एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) सुप्रीमो चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी राज्याचे 24 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते चौथ्यांदा राज्याची सूत्रे स्वीकारणार आहेत. यासह त्यांनी आंध्रमध्ये सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला.
नायडूंशिवाय जनसेना प्रमुख आणि अभिनेते पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच नायडू यांचा मुलगा नारा लोकेश याने तिसऱ्या क्रमांकावर शपथ घेतली. नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह 25 सदस्य असतील. यामध्ये टीडीपीच्या 20, जनसेनेच्या 3 आणि भाजपच्या एका मंत्र्यांचा समावेश आहे. एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे.
विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी पार्कमध्ये राज्यपाल अब्दुल नझीर यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एनडीएचे मंत्र्यांसह इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शपथविधीनंतर पंतप्रधान मोदींनी नायडूंना मिठी मारून त्यांचे अभिनंदन केले.
नायडू यांच्या मत्रिमंडळात टीडीपीचे सरचिटणीस नारा लोकेश, प्रदेशाध्यक्ष के. अचन्नैडू आणि जनसेना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष नदेंदला मनोहर यांना स्थान मिळाले आहे. टीडीपीच्या मंत्र्यांमध्ये 17 नवे चेहरे आहेत, उर्वरित ३ जण यापूर्वीही मंत्री होते.
पवन कल्याण, नदेंदला मनोहर आणि कंदुला दुर्गेश हे जनसेना पक्षाचे तीन मंत्री आहेत. सत्य कुमार यादव हे एकमेव भाजप आमदार आहेत, ज्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळात तीन महिला आहेत. ज्येष्ठ नेते एन मोहम्मद फारूख हे एकमेव मुस्लिम चेहरा आहेत.
मंत्र्यांच्या यादीत 8 मागासवर्गीय, 3 अनुसूचित जाती आणि 1 अनुसूचित जमातीचा समावेश आहे. नायडू यांनी कम्मा आणि कापू समाजातील प्रत्येकी 4 मंत्र्यांचा समावेश केला आहे. रेड्डी समाजातील 3 आणि वैश्य समाजातील 1 व्यक्तीलाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. नायडू हे स्वतः कम्मा समाजाचे आहेत. तर पवन कल्याण हे कापू समाजातील आहेत.
एनडीएला विधानसभेच्या 175 पैकी 164 जागा
आंध्र प्रदेशमध्ये ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. राज्यात टीडीपी, भाजप आणि जनसेना पक्ष (जेएसपी) यांनी एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. युतीमधील जागावाटपाच्या अंतर्गत, विधानसभेच्या 175 जागांपैकी टीडीपीने 144 जागांवर, जनसेना पक्षाने 21 जागांवर आणि भाजपने 10 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.
यामध्ये नायडूंच्या टीडीपीला 135 जागा, पवन कल्याणच्या जनसेनेला 21 जागा आणि भाजपला 8 जागा मिळाल्या. जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपीला केवळ 11 जागा मिळाल्या. काँग्रेसला राज्यात खातेही उघडता आले नाही.
राज्यातील लोकसभेच्या 25 जागांपैकी एनडीएने 21 जागा जिंकल्या आहेत. यामध्ये टीडीपीने 16, भाजपने 3 आणि जनसेना पक्षाने 2 जागा जिंकल्या आहेत. वायएसआरसीपीला 4 जागा मिळाल्या आहेत.