नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा उच्चांक गाठल्याने ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. गेल्या शुक्रवारपासून दरवाढीचा कल कायम असून, जागतिक बाजारात सोन्याचे भाव प्रति औंस 5,000 डॉलरच्या पुढे गेले आहेत. देशांतर्गत बाजारातही एमसीएक्स फ्युचर्समध्ये तेजी कायम आहे. (Finance Minister Nirmala Sitharaman)

या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दरवाढीमागील कारणांवर भाष्य केले. रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळासोबत झालेल्या अर्थसंकल्पोत्तर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, परिस्थिती सध्या चिंताजनक नसून सरकार आणि भारतीय रिझर्व बँक दोन्ही संस्थांकडून बाजारावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
दरवाढीमागील कारणे
अर्थमंत्र्यांच्या मते, सणासुदीच्या काळात देशांतर्गत मागणीत होणारी वाढ ही हंगामी स्वरूपाची असते. मात्र सध्या जागतिक पातळीवर केंद्रीय बँकांकडून मोठ्या प्रमाणावर सोने-चांदीची खरेदी सुरू आहे. या खरेदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किमतींवर दबाव वाढला आहे.
याशिवाय जागतिक अनिश्चितता, चलनातील अस्थिरता आणि शेअर बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी गुंतवणूकदार मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करत आहेत. अमेरिका-इराण तणाव तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांबाबतच्या विधानांचा देखील बाजारावर परिणाम झाल्याचे त्यांनी नमूद केले.
आयातीवर भारताची निर्भरता
भारत हा सोन्याच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. देशातील बाजारात उपलब्ध होणारे बहुतांश सोने आयात केले जाते. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या असल्या तरी त्या पुरेशा ठरत नसल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
देशांतर्गत बाजारातील स्थिती
सोमवारी (23 फेब्रुवारी) एमसीएक्सवर सोन्याचा दर 1.67 टक्क्यांनी वाढून 10 ग्रॅममागे 1,59,493 रुपयांवर व्यवहार करत होता. चांदीचा दर 5.02 टक्क्यांनी वाढून प्रतिकिलो 2,65,653 रुपयांवर पोहोचला. ‘गुड रिटर्न्स’च्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅममागे 1,61,350 रुपये नोंदवली गेली आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून येत आहे.
दरम्यान, जागतिक घडामोडी आणि केंद्रीय बँकांच्या खरेदी धोरणांचा परिणाम पुढील काळातही किमतींवर होत राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.







