Pune : पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे ग्रामदेवता जानाई देवीची यात्रा 10 एप्रिलपासून सुरू झाली आहे. ही यात्रा 10 ते 12 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. (pune)
तब्बल 150 वर्षांनंतर ही यात्रा पुन्हा भरवण्यात येत आहे. जेजुरीमध्ये खंडोबा देवाच्या वर्षाकाठी सुमारे 10 यात्रा भरतात, मात्र जानाई देवीच्या यात्रेची परंपरा दीडशे वर्षांपूर्वी खंडित झाली होती.

नुकतेच सुमारे 4 कोटी रुपये खर्चून जानाई देवीचे मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिर उभारणीनंतर जेजुरी ग्रामदेवता सार्वजनिक जानाई देवी मंदिर ट्रस्ट, श्री खंडोबा पालखी सोहळा समिती आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून ही यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
यात्रेदरम्यान मंदिरात अभिषेक आणि पूजा अर्चा सुरू असून देवीच्या पालखीची मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्त्यांचे आखाडे आणि बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले आहे.







