Big Breaking दौंड, ता. ६ : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण, सर्व्हिस रोड आणि पुलांच्या कामांदरम्यान ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक दिशादर्शक फलक, इशारे आणि सुरक्षा उपाययोजना नसल्याने अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. Big Breaking

चौफुला ते वरवंड दरम्यान अन्नपूर्णा हॉटेल शेजारी ओढ्यावर पुलाचे काम सुरू आहे. मात्र, या ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना, दिशादर्शक फलक किंवा डायव्हर्जनची माहिती नसल्याने वाहनचालक गोंधळून जात आहेत. याच निष्काळजीपणामुळे एका वाहनचालकाची गाडी थेट सुरू असलेल्या पुलाच्या कामात जाऊन पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली, मात्र हा प्रकार गंभीर इशारा मानला जात आहे. Big Breaking
दरम्यान, चौफुला ते वरवंड मार्गावर एचपी पेट्रोल पंप ते अन्नपूर्णा हॉटेल आणि पुढे केडगाव फाट्यापर्यंत काही ठिकाणी सर्व्हिस रोड पूर्ण झाला असला तरी अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट अवस्थेत आहे. “रस्ता पुढे बंद आहे” किंवा “डायव्हर्जन पुढे आहे” अशा कोणत्याही सूचना नसल्याने वाहनचालकांना अचानक अडथळ्यांना सामोरे जावे लागत असून अपघाताचा धोका अधिक वाढत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात यापूर्वीही अनेक किरकोळ अपघात घडले आहेत. तरीदेखील संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वेळीच योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. Big Breaking
नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. कामाच्या ठिकाणी स्पष्ट दिशादर्शक फलक लावणे, धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था करणे, तसेच अर्धवट रस्त्यांवर योग्य डायव्हर्जनची माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.





