इम्रान अत्तार
Bhor News भोर, ता. ६ :भोर शहरातील एसटी स्टँड परिसरापासून स्मशानभूमीमार्गे पद्मावती वस्तीपर्यंत जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे काम मागील दोन ते तीन महिन्यांपासून ठप्प असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नगरपालिकेतील काही सदस्यांनी या विकासकामाला हरकत घेतल्यामुळेच रस्त्याचे काम थांबले असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. Bhor News

हा रस्ता पद्मावती वस्तीतील नागरिकांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. मात्र, अपूर्ण कामामुळे सुमारे 150 नागरिकांना रोजच्या जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जात असल्याने ये-जा करणे अत्यंत धोकादायक ठरते. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच आजारी व्यक्तींना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. Bhor News
पावसाळा अगदी उंबरठ्यावर असताना देखील काम पूर्ण झाले नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, तात्काळ काम सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याची ठाम मागणी केली आहे. Bhor News
यासंदर्भात पद्मावती वस्तीतील नागरिकांनी नगरपालिकेला निवेदन सादर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मूलभूत सुविधांसाठीही आम्हाला संघर्ष करावा लागत आहे. जर प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल,” असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.







