विशाल शिंदे

पुणे : भोर तालुक्यातील तांभाड गावाच्या हद्दीत महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी करून ट्रान्सफॉर्मरचे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांभाड गावातील भरत पर्वती सोनकर यांच्या मालकीच्या जमिनीवरील मोकळ्या जागेत महावितरण कंपनीचा 63 केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. 19 जुलैच्या पहाटे ते दुपारदरम्यान अज्ञात चोरट्याने ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे 35 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या.

चोरी करताना चोरट्याने ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल बाहेर सांडून ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान केले. चोरी झालेल्या तांब्याच्या तारांची अंदाजे किंमत सुमारे 17,500 रुपये असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
या प्रकारामुळे परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, महावितरणला आर्थिक नुकसानही सहन करावे लागले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी राजगड पोलीस तपास करत आहेत.







