Pune Cyber Fraud हडपसर, ता. 6 : पुणे शहरातील हडपसर परिसरात सायबर गुन्हेगारांनी नवनवीन पद्धतीने नागरिकांना जाळ्यात ओढत मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. डेटिंग अॅपवरून ओळख वाढवून ऑनलाईन व्यवसायाचे आमिष तसेच शेअर व्यवहारातून भरघोस नफा मिळवून देण्याच्या नावाखाली दोन वेगवेगळ्या प्रकरणांत तब्बल 20 लाखांहून अधिक रक्कम लंपास करण्यात आली आहे. Pune Cyber Fraud
पहिल्या प्रकरणात प्रितम प्रमोद जोशी (वय 30, रा. हडपसर) यांना ‘बिलाँग’ या डेटिंग अॅपवर अनाया शर्मा नावाच्या महिलेने संपर्क साधला. संवादातून विश्वास संपादन करत तिने ऑनलाईन वस्तू विक्री (ड्रॉप शिपिंग) व्यवसायाची माहिती दिली आणि एका संकेतस्थळाची लिंक पाठवून ऑनलाईन दुकान सुरू करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला कमी रक्कम गुंतवून नफा दाखवण्यात आल्याने विश्वास बसला. त्यानंतर विविध कारणे सांगत वेगवेगळ्या खात्यांवर पैसे भरण्यास भाग पाडत अखेर 15 लाख 31 हजार रुपये उकळण्यात आले. पैसे काढण्याचा प्रयत्न करताच खाते बंद करून आरोपींनी संपर्क तोडला. Pune Cyber Fraud

दुसऱ्या प्रकरणात शेखरीपुरम अनंथक्रिशनन रंगनाथन (वय 68, रा. हडपसर) यांना व्हॉट्सअॅपवरील एका गटाद्वारे शेअर व्यवहारात मोठा नफा मिळण्याचे आमिष दाखवण्यात आले. विविध लिंक व अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आरोपींनी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 4 लाख 79 हजार रुपये उकळले. नंतर पैसे काढण्यासाठी आणखी मोठी रक्कम भरण्याची अट घालण्यात आली. मात्र पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, या दोन्ही प्रकरणांमध्ये पीडितांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
नागरिकांसाठी इशारा :
अनोळखी व्यक्ती, आकर्षक ऑफर, डेटिंग अॅप किंवा समाजमाध्यमांवरील गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नका. कोणतीही लिंक, अॅप किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खातरजमा करा. फसवणुकीची शंका आल्यास तात्काळ 1930 या सायबर मदत क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. Pune Cyber Fraud







