पुणे: समुद्राच्या तळाशी रंगीबेरंगी दगडांसारख्या दिसणाऱ्या प्रवाळ भित्ती समुद्री परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनेक समुद्री जीवांना या प्रवाळांमुळे निवारा आणि अन्न मिळते. मात्र, वाढते समुद्री तापमान आणि हवामानातील बदल यामुळे प्रवाळ भित्तींवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. त्यातच वर्षाच्या अखेरीस शक्तिशाली ‘एल नीनो’ तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने चिंता वाढली आहे.

एल नीनो ही प्रशांत महासागरातील नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. या काळात मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अधिक वाढते. त्याचा परिणाम केवळ त्या भागापुरता मर्यादित राहत नाही. जगातील अनेक प्रदेशांमध्ये पाऊस, तापमान आणि हवामानाच्या पद्धतीवर त्याचा प्रभाव पडतो.

समुद्राचे तापमान सातत्याने वाढल्यास प्रवाळांना मोठा ताण सहन करावा लागतो. प्रवाळांच्या शरीरात राहणारे सूक्ष्म शैवाल त्यांना ऊर्जा देतात. मात्र, पाणी अधिक गरम झाल्यावर हे शैवाल बाहेर पडतात आणि प्रवाळांचा रंग पांढरा होतो. या प्रक्रियेला ‘ब्लिचिंग’ किंवा प्रवाळ विरंजन म्हणतात. उष्णतेचा ताण दीर्घकाळ राहिल्यास प्रवाळांचा मृत्यू होऊ शकतो.

भारतासाठीही एल नीनो चिंतेचा विषय ठरू शकतो. या हवामान घटनेमुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे खरीप पिकांसोबतच पुढील रब्बी हंगामावरही परिणाम होऊ शकतो. काही भागांत पावसाची कमतरता, तर काही ठिकाणी अतिवृष्टी किंवा पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.
दरम्यान, सुमारे 1,000 वर्षांच्या प्रवाळांच्या नोंदींच्या अभ्यासातून शक्तिशाली एल नीनोच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे संकेत मिळाले आहेत. संशोधकांच्या मते, जागतिक तापमानवाढीमुळे भविष्यात अशा तीव्र हवामान घटनांची वारंवारता वाढू शकते.
त्यामुळे आगामी काळात ‘सुपर एल नीनो’ची स्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम समुद्री परिसंस्था, शेती आणि जगातील विविध भागांच्या हवामानावर होण्याची शक्यता आहे. हवामान बदलाचा वेग कमी करण्यासाठी कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण ठेवणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.







