पुणे : महाराष्ट्रात सध्या गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. पुरेसा पाऊस न पडल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक टंचाई तर उभी राहिलीच आहे, पण त्याचसोबत जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व गंभीर प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 26 सप्टेंबर रोजी पंढरपूर शहरात भव्य ‘दुष्काळ आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

या आंदोलनाची पूर्वतयारी आणि नियोजन करण्यासाठी पंढरपूर येथे एक विशेष बैठक पार पडली, ज्यामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली. आंदोलन सुरू होण्यापूर्वी लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे नेते श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे घालणार आहेत. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीस आमदार उत्तम जानकर व आमदार नारायण पाटील उपस्थित न राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दुसऱ्या बाजूला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. त्यांनी धाराशिव, लातूर आणि वाशीम जिल्ह्यांतील शेतकर्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांची विचारपूस केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. “राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून लवकरच योग्य ती मदत पुरवली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

याशिवाय शनिवारपर्यंत दुष्काळाबाबतचा अधिकृत सरकारी निर्णय प्रसिद्ध केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.एकीकडे शेतीचे उत्पन्न घटल्याने घरातील मुलींच्या विवाहाची चिंताही पालकांना भेडसावत आहे. असे असूनही शासनाकडून अद्याप अधिकृत दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही किंवा कोणतीही विशेष आर्थिक मदत जाहीर झालेली नाही, ज्यामुळे बळीराजा हवालदील झाला आहे.






