मुंबई : महिला प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फ्रँचायझीने आपल्या महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदात बदल केला असून, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ल्यूक विल्यम्स यांची या पदावर नियुक्ती केली आहे. यापूर्वी ही जबाबदारी लिसा केटली सांभाळत होत्या. त्या पायउतार झाल्यानंतर व्यवस्थापनाने विल्यम्स यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

ल्यूक विल्यम्स हे महिला क्रिकेट जगतातील एक नावाजलेले नाव मानले जाते. त्यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा मोठा अनुभव आहे. याआधी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 2024 मध्ये WPL चे विजेतेपद पटकावले होते. याशिवाय महिला बिग बॅश लीग मध्ये त्यांनी ॲडलेड स्ट्रायकर्स संघाला 2022 आणि 2023 मध्ये सलग दोनदा चॅम्पियन बनवले, तर दोन वेळा उपविजेतेपद मिळवून दिले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि इतर लीगमध्येही त्यांचा चांगला दबदबा राहिला आहे. 2023 मध्ये ‘द हंड्रेड’ स्पर्धेत ‘सदर्न ब्रेव्ह’ संघ विजेता ठरला होता, तेव्हा ते सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघासाठीही सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे.

खेळाडू म्हणून ल्यूक विल्यम्स यांनी ॲडलेड बफॅलोज संघाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर 2005/06, 2007/08 आणि 2009/10 या वर्षांमध्ये तीन वेळा प्रतिष्ठित ब्रॅडमन पदक जिंकले होते. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आपले पूर्ण लक्ष प्रशिक्षकपदावर केंद्रित केले.
WPL च्या इतिहासात आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि RCB या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन वेळा ट्रॉफी जिंकली आहे. आता एका अनुभवी प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ तिसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरण्यात यशस्वी ठरणार का, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.







