विशाल कदम

पुणे, ता. 24 : ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने गावांचा कारभार आधी प्रशासकांच्या हाती देण्यात आला. त्यानंतर प्रशासकीय फेरबदल आणि आदेशांच्या प्रक्रियेतून पुन्हा गावांचा कारभार बदलला. आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, एका प्रशासकाच्या खांद्यावर अनेक गावांचा कारभार सोपविल्याने प्रत्यक्षात गावगाडा चालणार तरी कसा? असा सवाल हवेलीतील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्य शासनाच्या 8 सप्टेंबर 2026 रोजीच्या अधिसूचनेनंतर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी 9 सप्टेंबर रोजी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले. हवेली तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींचा कारभारही प्रशासकांकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, एका अधिकाऱ्याकडे एक-दोन नव्हे तर अनेक ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काही प्रशासकांकडे चार, पाच, सहा तर काहींकडे आठ गावांची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गावाला पुरेसा वेळ देणे, ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेणे, विकासकामांच्या प्रस्तावांवर निर्णय घेणे आणि दैनंदिन ग्रामपंचायत कामकाजावर लक्ष ठेवणे कितपत शक्य होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
अधिकारी गावात येणार कधी?
प्रशासक म्हणून नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांवर त्यांच्या नियमित प्रशासकीय कामाची जबाबदारीही असते. त्यातच अनेक गावांचा अतिरिक्त पदभार दिल्यास ग्रामस्थांना अधिकारी भेटणार कधी आणि त्यांच्या समस्या सुटणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात दाखले, विविध परवानग्या, विकासकामांचे प्रस्ताव, निधीशी संबंधित कामे तसेच नागरिकांच्या तक्रारी यासाठी ग्रामस्थांना वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी प्रशासनाने ठोस व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, काही गावांची लोकसंख्या मोठी असून त्यांच्या दैनंदिन कारभाराचा व्यापही मोठा आहे. अशा गावांचा कारभार दुसऱ्या गावांसह एकाच प्रशासकाकडे सोपविल्यास निर्णय प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
विकासकामांना ‘ब्रेक’ लागणार का?
ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याने आधीच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार लोकप्रतिनिधींविना सुरू आहे. त्यात आता अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याकडे सोपविल्याने गावांच्या विकासकामांना गती मिळणार की प्रशासकीय फेऱ्यांमध्ये ती रखडणार? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी प्रशासकाला पुरेसा वेळ उपलब्ध करून देणे, नियमित गावभेटी निश्चित करणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
हवेलीतील ग्रामपंचायतींची जबाबदारी
राजेंद्र तुकाराम सात्रस — थेऊर, केसनंद, डोंगरगाव, भावडी, बकोरी, शिरसवडी, तुळापूर, वढू खुर्द
पोपट चिमा केदारी — कोरेगाव मुळ, कुंजीरवाडी, नायगाव, बिवरी, न्हावी सांडस, प्रयागधाम, तरडे, वळती
महेश पोपटराव वाघमारे — खेडशिवापूर, कुडजे, घेरा सिंहगड, गो-हे खु., सोनापूर
जयश्री बाजीराव बेनके — लोणी काळभोर, सोरतापवाडी, उरुळी कांचन, वडकी
हर्षल गौतम रोकडे — अष्टापूर, श्रीरामनगर, शिंदेवाडी, शिवापूर
अब्दुल रज्जाक नजीरखान मुल्ला — डोणजे, खडकवाडी, गो-हे बु., आंबी
निलेश दत्तात्रय धानापुने — कोंढणपूर, आर्वी, गाऊडदरा, मणेरवाडी
प्रिती गणेश जगदाळे — शिंदवणे, भवरापूर, आळंदी-म्हातोबा
शकुंतला परमेश्वर चाटे — हिंगणगाव, पेठ, सांगवी सांडस, बहुली
राजेश जयराम निकाळजे — मांडवी बु., मांडवी खुर्द, सांगरूण, वरदाडे
“सध्या नियुक्त करण्यात आलेले प्रशासक गावात आतापर्यंत एकदाच आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीशी संबंधित कामांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांच्या दैनंदिन अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी अधिकारी गावात उपलब्ध असणे गरजेचे आहे. यापूर्वी सरपंचांकडे कारभार होता, ते काय वाईट होते? निदान ते दररोज गावात उपलब्ध असायचे, त्यामुळे नागरिकांची कामे वेळेत होत होती. आता प्रशासकांकडे अनेक गावांचा कारभार असल्याने नागरिकांना नेमके आपले प्रश्न कोणाकडे मांडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.”
-हरेश गोठे (माजी सरपंच – कुंजीरवाडी, ता. हवेली)
याबाबत बोलताना उरुळी कांचनचे माजी सरपंच म्हणाले, ” शासनाने नेमून दिलेले प्रशासक ग्रामपंचायत कार्यालयात हजेरी लवत नसल्याने गावातील नागीकांची कामे होत नाहीत. तसेच ग्रामपंचायत अधिकारी कामानिमित्त बाहेर जातात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नाहीत. त्यामुळे शासनाने नेमून दिलेले प्रशासक यांनी नियमित हजेरी लावून कामे मार्गी लावावी अथवा सरपंच प्रशासक यांची पुन्हा निवड करावी.
-भाऊसाहेब कांचन (माजी सरपंच – उरुळी कांचन, ता. हवेली)






