न्हावरे: आलेगाव पागा (ता. शिरूर) परिसरातील आलेगाव पाझर तलावालगतच्या शासकीय गायरान तसेच वन विभागाच्या जमिनीतून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मुरूम उत्खनन सुरू असून,पोकलेन व जेसीबी मशीनच्या सहाय्याने मुरूम काढून हायवांच्या माध्यमातून त्याची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक केली जात असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची तक्रार पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

संबंधित ठिकाणी रात्री सुमारे दहा वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाचे उत्खनन सुरू असते.उत्खनन आलेगाव पागा हद्दीत केले जात असून,त्यानंतर मुरुमाची वाहतूक न्हावरे हद्दीतून केली जाते.विशेष म्हणजे ही वाहने न्हावरे मंडलाधिकारी कार्यालयासमोरून जात असल्याचा दावा तक्रारदार पर्यावरण प्रेमींनी केला आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या यंत्रणेला हा प्रकार दिसत नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

‘तक्रारी करूनही कारवाई नाही’
या कथित मुरूम उत्खननाबाबत पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकारी, पुणे तसेच तहसीलदार,शिरूर यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रारी केल्याचे सांगण्यात येते.मात्र, तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली दिसत नसल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शासकीय गायरान व वन विभागाच्या जमिनीतून अनधिकृतपणे गौण खनिजाचे उत्खनन होत असेल,तर त्याची तातडीने पाहणी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करणे आवश्यक आहे.परंतू, रात्रीच्या वेळी उत्खनन आणि दिवसा वाहतूक सुरू असल्याचा आरोप होत असतानाही कारवाई होत नसल्याने ‘गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांना महसूल विभागाचे अभय आहे का?’ असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.
शासनाचा लाखोंचा महसूल बुडतोय; जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
अनधिकृत मुरूम उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडण्याबरोबरच शासकीय जमीन आणि पर्यावरणाचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आलेगाव पाझर तलाव परिसरातील उत्खननाची महसूल व वन विभागाने संयुक्तपणे प्रत्यक्ष पाहणी करावी.उत्खननाचे प्रमाण निश्चित करावे आणि संबंधितांकडे परवानगी आहे की नाही.याची चौकशी करावी,अशी मागणी होत आहे.
तसेच याप्रकरणी तक्रारी प्राप्त होऊनही कारवाईस टाळाटाळ झाली असल्यास संबंधित स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करून शासनाने कठोर कारवाई करावी.अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.आता महसूल विभाग या गंभीर तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करतेय का,की गौण खनिज उत्खननाचा हा कथित ‘रात्रीचा खेळ’ असाच सुरू राहणार.याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
याप्रकरणी न्हावरे मंडलचे मंडलाधिकारी प्रशांत कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना पंचनामा करण्यासाठी सूचना देण्यात येईल असे सांगितले.






