पुणे : निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद समोर आल्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एसआयआर प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. आता या राजकीय वादात ‘कॉक्रोच जनता पक्ष’ या पक्षाने थेट उडी घेतली आहे.

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्ञानेश कुमार यांनी पुढील 48 तासांच्या आत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा थेट इशारा दीपके यांनी दिला आहे. दिलेली मुदत संपण्यापूर्वी राजीनामा आला नाही, तर संपूर्ण देशभरात तीव्र आंदोलने छेडली जातील, असा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे.

अभिजीत दीपके यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना सांगितले की, एसआयआरच्या माध्यमातून देशातील जवळपास 13 कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे मतदानाचे अधिकार हिरावून घेण्यात आले आहेत. नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवले जात असून, लोकशाहीत जनता सरकार निवडते; मात्र सध्याच्या परिस्थितीत कोण मतदान करणार आणि कोण नाही, हे सरकार ठरवत आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात लोकशाहीची मूळ व्याख्या बदलून तिथे हुकूमशाही आणली गेल्याचा आरोपही दीपके यांनी केला. निवडणूक आयुक्तांमधील मतभेदांचा दाखला देत त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत निशाणा साधला आहे. या सर्व घडामोडींमुळे केंद्र सरकारवर राजकीय दबाव वाढला असून, येत्या काही दिवसांत हे आंदोलन काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







