पुणे: लोहगाव परिसरात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आई काही कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर तिने मुलीला विश्वासाने शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी ठेवले होते. याच वेळी घरात असलेल्या 20 वर्षीय तरुणाने संधी साधून मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

ही घटना बुधवारी, 30 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. पीडित मुलगी कुटुंबासह लोहगाव परिसरात राहते. आई बाहेर गेल्यानंतर मुलीला शेजारच्या महिलेच्या घरी सोडण्यात आले होते. त्यावेळी त्या महिलेचा दीरही घरात उपस्थित होता. संबंधित महिला स्वयंपाकघरातील कामात व्यस्त असताना आरोपीने चिमुरडीवर अत्यचार केले.

काही वेळाने मुलगी घरी परतल्यानंतर तिची अवस्था पाहून आईला संशय आला. मुलीच्या कपड्यांची अवस्था पाहून आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर चिमुरडीने घडलेला प्रकार आईला सांगितला. घटनेची माहिती मिळताच आईने तातडीने लोहगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आणि काही वेळातच संशयित तरुणाला ताब्यात घेतले. ऋतिक बाबूराव शिंदे (वय 20, मूळ रा. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लोहगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.






