उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील तळवडी चौकात काळ्या रंगाच्या थार गाडीमधून आलेल्या दोघांनी दारूच्या नशेत खासगी प्रवासी बस आडवून तिची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी (ता. 23) रात्री घडली. या प्रकारात बसच्या समोरील काच, लाईट, बोनेट आणि वायपरचे नुकसान झाले.

दारुड्यांच्या या गुंडगिरीमुळे संतापलेल्या परिसरातील नागरिकांनी दोघांनाही चांगलाच चोप दिला असून याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात थार चालकांसह दोघांवर विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 23) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
MH 12 ZW 8355 वरील चालक किरण पांडुरंग गुरव व संतोश चंद्रकांत बोराटे (रा. दोघेही नांदुर ता. दौंड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. याबाबत ट्रॅव्हल्स चालक अजय लहू काळे (वय-25, व्यवसाय – खाजगी चालक, मूळ रा. वरपगाव, ता. आंबेजोगाई, जि. बीड) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स चालक अजय काळे शुक्रवारी रात्री भोसरी येथून प्रवाशांना घेऊन अंबेजोगाईकडे निघाले होते. त्यांच्या ताब्यातील ‘ब्ल्यू नाईन’ कंपनीची ट्रॅव्हल्स बस (क्र. OR 11 C 2525) पुणे-सोलापूर महामार्गाने जात असताना, रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन गावच्या हद्दीतील तळवडी चौकात आली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एका काळ्या रंगाच्या थार गाडीने भरधाव वेगात येऊन ट्रॅव्हल्सच्या पुढे गाडी आडवी मारून तिला अडवले.

थार गाडीतून उतरलेले किरण गुरव आणि संतोष बोराटे हे दोघेही दारूच्या नशेत धुंद होते. त्यांनी कुठल्यातरी हत्याराच्या साह्याने ट्रॅव्हल्स बसची समोरील काच, समोरील लाईट, बोनेट आणि वायपर फोडून गाडीचे मोठे नुकसान केले व भर रस्त्यात शिवीगाळ करत गोंधळ घातला. सार्वजनिक रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास दारू पिऊन चाललेला हा राडा आणि ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची झालेली घाबरगुंडी पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या आणि परिसरातील संतप्त नागरिकांनी त्या ठिकाणी जमा होऊन धुडगूस घालणाऱ्या या दोघांनाही चांगलाच चोप दिला. असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, ट्रॅव्हल्स चालक अजय काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलिसांनी दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार गाडेकर करत आहेत.






