नाशिक : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणे आणि लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत.. गेल्या पाच महिन्यांपासून तो तुरुंगात असून, आज न्यायालय त्याला जामीन मंजूर करणार की त्याचा अर्ज फेटाळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणात सरकारची बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम हे पहिल्यांदाच न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत. राज्य सरकारने जून महिन्यात त्यांची या खटल्यासाठी नियुक्ती केली होती. आजच्या सुनावणीदरम्यान एसआयटी आणि पोलीस तपास यंत्रणा खरातविरोधातील भक्कम पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमोर मांडतील. पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी सरकार पक्षाकडून त्याच्या जामीन अर्जाला कडक विरोध केला जाण्याची शक्यता आहे.

अशोक खरातवर नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यांमध्ये मिळून तब्बल 17 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन 12 गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे.

तुरुंगात आणि पोलीस कोठडीत असतानाही अशोक खरातचे अजब वर्तन सुरूच आहे. तिथे बसून मोठ्याने मंत्रजप करणे, विचित्र भाषेत पुटपुटणे आणि आपल्या काळ्या कारनाम्यांचे ‘दैवी विधी’ म्हणून समर्थन करणे, अशा हालचाली तो करत आहे. या मानसिक नाटकांच्या माध्यमातून पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मात्र, एसआयटी आणि नाशिक पोलिसांनी या प्रकरणी तपासाचा फास अधिक घट्ट केला आहे. आजच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे पीडित महिलांसह संपूर्ण नाशिककरांचे डोळे लागले आहेत.







