पुणे : कॉकरोच जनता पार्टीच्या प्रस्तावित आंदोलनावरून भाजप नेते नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर टीका करताना राणे यांनी थेट सवाल केला की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यासाठीच हे आंदोलन आयोजित केले गेले आहे का?

नितेश राणे यांनी आरोप केला की, सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका छायाचित्रात छत्रपती शिवरायांच्या खाली मावळ्यांच्या जागी कीटक (कॉकरोच) दाखवण्यात आले आहेत. याशिवाय दुसऱ्या एका फोटोत महात्मा गांधी यांच्या पायाजवळ आणि चप्पलेजवळ महाराजांचे नाव लिहिले गेले आहे. ही कृत्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारी असून, कोणताही शिवप्रेमी किंवा देशभक्त हा अपमान सहन करणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले. यामुळे दीपके यांनी तातडीने महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

आंदोलनाच्या हेतूवर शंका उपस्थित करताना राणे म्हणाले की, हे आंदोलन टिपू सुलतान आणि उमर खालिद यांच्या समर्थकांचे आहे का? उमर खालिदवर देशविरोधी कारवाया आणि शरिया कायद्याचे समर्थन केल्याचा आरोप असताना, अशा व्यक्तींच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांना कुणाचा पाठिंबा आहे, असा सवाल त्यांनी विचारला. या आंदोलनात देशविरोधी शक्ती सामील असल्याचा आरोप करत त्यांनी थेट आव्हान दिले की, “महाराष्ट्रात लोकशाही आहे म्हणून हे शक्य होते, हिंमत असेल तर अशी आंदोलने पाकिस्तानमध्ये करून दाखवा.”

या संपूर्ण प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावरही राणे यांनी टीकास्त्र सोडले. महाराजांचा अपमान होत असताना ठाकरे गटाचे नेते गप्प का आहेत, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी विचारले की, जर ते अशा गोष्टींना पाठिंबा देत असतील, तर ते कसले ठाकरेंचे वारसदार? नितेश राणे यांनी स्पष्ट केले की, राजकारण बाजूला ठेवून छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांविरोधात सर्वांनी एकत्र आले पाहिजे..







