रायगड : दिवेआगर समुद्रकिनारी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे विद्यार्थी आळंदी येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते. समुद्रात पोहण्यासाठी उतरल्यानंतर आठही विद्यार्थी पाण्याच्या प्रवाहात ओढले गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथील खासगी क्लासची सहल दिवेआगर येथे पर्यटनासाठी आली होती. विद्यार्थी समुद्रकिनारी फिरत असताना काही विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात उतरले. यावेळी ते खोल पाण्यात गेल्याने अचानक समुद्राच्या प्रवाहात अडकले. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

स्थानिकांच्या मदतीने आठही विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय उपचार सुरू असतानाच आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेची माहिती घेण्यासह पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणती खबरदारी घेण्यात आली होती, याचीही माहिती घेतली जात आहे.
दिवेआगर समुद्रकिनारी घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समुद्रात उतरताना पर्यटकांनी पाण्याची खोली, समुद्राचा प्रवाह आणि स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षा सूचनांची माहिती घेऊनच समुद्रात उतरावे, असे आवाहन करण्यात येत आहे.






