पुणे : समृद्धी महामार्गावरील वेगाचा थरार पुन्हा एकदा एका प्रवाशाच्या जीवावर बेतल्याची घटना उघडकीस आली आहे. वैजापूर परिसराजवळ एका भरधाव ट्रॅव्हल्सने समोरील कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या दुर्दैवी अपघातात 65 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून, 10 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही खासगी ट्रॅव्हल्स बस छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने वेगात जात होती. वैजापूरजवळ आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस पुढे जाणाऱ्या कंटेनरवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताच्या वेळी बसमधील प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि गोंधळ उडाला.

या अपघातात हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय ६५, रा. वैजापूर) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे . घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

या भीषण दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. प्राथमिक अंदाजानुसार, ट्रॅव्हल्सचा अतिवेग हेच या दुर्घटनेमागचे मुख्य कारण मानले जात आहे. मात्र, चालकाला झोप अनावर झाली की तांत्रिक बिघाड झाला, याचा अचूक शोध पोलीस घेत आहेत.
समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अशा भीषण अपघातांमुळे आता पुन्हा एकदा वाहनांचा अमर्याद वेग आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे.






