पुणे : घराण्यातील अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि लहान वयात झालेला विवाह अशा अनेक अडचणींचा सामना करत बारामती तालुक्यातील करंजे येथील जिद्दी महिलेने तिचे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. परंतु, सासरच्या त्रासामुळे आणि पतीच्या अमानुष छळाला कंटाळून या 31 वर्षीय महिला कर्मचाऱ्याने स्वतःचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संगीता राजेंद्र काळे (संगीता किरण भोसले)असं मृत महिला पोलीसाच नावं आहे पती किरण भानूदास भोसले याच्याविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.लहानपणीच लग्न झाल्यानंतरही संगीता यांनी हार मानली नाही. जिद्दीच्या जोरावर त्यांनी अभ्यास केला आणि पोलीस सेवेत प्रवेश मिळवला. बारामती तालुक्यातील करंजे हे त्यांचे माहेर तर सुपे हे सासर होते. नोकरीनिमित्त त्या पती किरण भोसले याच्यासोबत डोंबिवली येथे वास्तव्यास होत्या.

काही काळ संसार सुरळीत चालल्यानंतर पतीने संगीता यांचा छळ करण्यास सुरुवात केली. गेल्या काही महिन्यांपासून पतीकडून मिळणारा शारीरिक व मानसिक त्रास अत्यंत असह्य झाला होता. या सततच्या त्रासाला वैतागून अखेर त्यांनी राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला.

या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक हिंसाचाराविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. विष्णूनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






