पुणे : तुम्ही LPG किंवा PNG वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सप्टेंबर महिना सुरू होताच LPG आणि PNG ग्राहकांसाठी महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. गॅस सिलेंडरच्या किंमती, LPG e-KYC आणि नवीन PNG कनेक्शनशी संबंधित नियम किंवा सवलतींचा थेट परिणाम ग्राहकांवर होऊ शकतो. त्यामुळे गॅस ग्राहकांनी या बदलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

तेल विपणन कंपन्या साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेतात. 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडर तसेच 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. ऑगस्टमध्ये घरगुती LPG सिलेंडरचे दर स्थिर होते. मात्र व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 192 रुपयांची कपात करण्यात आली होती आणि त्याचा दर 2738 रुपये झाला होता. त्यामुळे सप्टेंबरमध्ये घरगुती गॅसच्या दरात कपात होणार की वाढ होणार, याकडे ग्राहकांचं लक्ष लागलं आहे. याबद्दलचा निर्णय 1 सप्टेंबरला स्पष्ट होणार आहे.

LPG ग्राहकांसाठी आधार आधारित बायोमेट्रिक e-KYC महत्त्वाची आहे. दिलेल्या माहितीनुसार, आज 31ऑगस्ट 2026ला ही e-KYC पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. ज्यांनी अजून ईकेवायसी केलेली नाही, त्यांनी आजच प्रोसेस पूर्ण करणं योग्य ठरेल. e-KYC ऑनलाइन पद्धतीने किंवा संबंधित गॅस एजन्सीमध्ये जाऊन करता येऊ शकते. वेळेत प्रोसेस न केल्याे भविष्यात सब्सिडी किंवा सिलेंडरच्या पुरवठ्याशी संबंधित अडचणी येऊ शकतात.

नवीन PNG कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांसाठी प्रोत्साहन योजना सुरू होण्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये नवीन ग्राहकांना रजिस्ट्रेशन किंवा सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये सवलत अथवा सोप्या EMI पर्यायांचा लाभ मिळू शकतो.







