दौंड, ता. 10 : वरवंड (ता. दौंड) येथील ग्रामदैवत श्री गोपीनाथ मंदिराच्या पवित्र गाभाऱ्यात एका भाविकाने देवाच्या पिंडीवर पाय ठेवून गळतीच्या साखळीला धरून उभे राहण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुग्रीव सर्जेराव पवार (रा. सोगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मंदिराचे पुजारी रमेश प्रभाकर काकडे (वय-65) यांनी यवत पोलीस ठाणे अंकित पाटस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराचे पुजारी रमेश प्रभाकर काकडे गुरुवारी (ता. 09) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ते मंदिराची साफसफाई आणि पूजेची तयारी करण्यासाठी गेले होते. त्यांनी गाभाऱ्याचे कुलूप उघडले असता, बाहेर नंदीजवळ बसलेला एक इसम त्यांच्या पाठोपाठ आत शिरला.
पुजारी काकडे सफाई करून बाहेर आले, तरीही तो इसम बाहेर आला नाही. त्यामुळे साडेचार वाजता काकडे यांनी पुन्हा गाभाऱ्यात जाऊन पाहिले असता, तो इसम चक्क महादेवाच्या पिंडीवर चढून गळतीच्या लोखंडी साखळीला धरून उभा असल्याचे दिसले. पुजाऱ्यांनी त्याला तत्काळ हाताला धरून गाभाऱ्यातून बाहेर काढले.
या घटनेनंतर पुजारी काकडे यांनी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ दिवेकर यांना माहिती दिली. ग्रामस्थ मोठ्या संख्येने मंदिरात जमा झाले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये या इसमाचे कृत्य स्पष्टपणे कैद झाले होते. ग्रामस्थांनी त्याला ओळखले असून, त्याचे नाव सुग्रीव सर्जेराव पवार (रा. सोगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असल्याचे निष्पन्न झाले. हा इसम काही वर्षे वरवंडमध्ये राहिला असून तो अधूनमधून दर्शनासाठी येत असल्याचे समजले.
दरम्यान, गावातील सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी पाटस पोलीस चौकी गाठली. पुजारी रमेश काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी आरोपी सुग्रीव पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 298 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोल्हे करत आहेत. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारे अशोभनीय कृत्य केल्याने परिसरात चर्चा सुरू आहे.







