Bullet Gang फुरसुंगी, ता. १५ : पुण्यातील प्रसिद्ध दिवे घाट परिसरात मध्यरात्री बुलेटस्वार तरुणांनी अक्षरशः दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३० ते ४० तरुणांचा घोळका बुलेटच्या कर्कश सायलन्सरचा आवाज करत घाट परिसरात थांबला होता. एवढेच नव्हे तर काही जणांच्या हातात धारदार लोखंडी हत्यारे असल्याचेही व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या अज्ञात बुलेट गँगविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. Bullet Gang

फुरसुंगी पोलीसठाण्याचे पोलीस अंमलदार विष्णु हनुमंत फड यांनी याबाबत सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मेच्या रात्री ते आणि पोलीस अंमलदार हंबर्डे हे उरुळी देवाची परिसरात बीट मार्शल म्हणून पेट्रोलिंग करत होते. त्याचवेळी एमडीटीवर दिवे घाटात ३० ते ४० तरुण बुलेटच्या सायलन्सरचा प्रचंड आवाज करून नागरिकांना त्रास देत असल्याचा कॉल प्राप्त झाला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दिवे घाटाकडे धाव घेतली. मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच सर्व बुलेटस्वार पसार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी घाट परिसरात पेट्रोलिंग सुरू ठेवले. Bullet Gang

दरम्यान, दुसऱ्या दिवशी दिवे घाटातील संबंधित व्हिडीओ प्रसारित झाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसही हादरले. व्हिडीओमध्ये अनेक तरुण दुचाकी थांबवून मोठ्या आवाजात सायलन्सर फोडताना दिसत आहेत. काही तरुणांनी हातात धारदार कोयते आणि लोखंडी हत्यारे घेत हवेत फिरवत आरडाओरडा केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडीओमध्ये घाटातून जाणारे वाहनचालक आणि प्रवासी हे न थांबता भीतीपोटी पुढे जात असल्याचेही दिसत आहे. मध्यरात्री घाट परिसरात सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. Bullet Gang
दिवे घाट परिसरात रात्रीच्या वेळी बुलेटस्वार तरुणांचे टोळके वारंवार जमा होत असून, कर्कश सायलन्सर, स्टंटबाजी आणि दहशतीचे प्रकार वाढले आहेत. मात्र यावेळी थेट हातात हत्यारे घेऊन आरडाओरडा करण्यात आल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. विशेष म्हणजे, पुणे पोलिसांनी १२ मे ते २५ मे दरम्यान शहरात शस्त्रबंदी आदेश लागू केलेले असतानाही संबंधित तरुणांनी धारदार हत्यारे बाळगून आदेशाचा उघडपणे भंग केल्याचे समोर आले आहे. Bullet Gang
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी शस्त्र अधिनियम, १९५९ – 25,4 ; फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम, १९३२ – 7 ; महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ – 135,37(1) ; भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 3(5) प्रमाणे अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Bullet Gang
“बुलेट गँग”चा शोध सुरू; पोलिसांची विशेष पथके सक्रिय
व्हिडीओतील तरुणांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडिया आणि वाहन क्रमांकांची तपासणी सुरू केली आहे. “दिवे घाटात दहशत माजवणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही,” असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. या घटनेमुळे पुणे शहरात पुन्हा एकदा बुलेट गँग, सायलन्सर मॉडिफिकेशन आणि रात्रीच्या स्टंटबाजीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. Bullet Gang







