Solapur : सोलापूर जिल्ह्यात अनाधिकृत महापुरुषांच्या पुतळ्यांवरून निर्माण होणाऱ्या तणावावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने अवलंबलेल्या ‘भोसे पॅटर्न’नुसार माढा तालुक्यातील मोडलिंब गावात ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेत अनधिकृत पुतळे हटवले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील भोसे गावात या पद्धतीचा पहिला प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर मोडलिंब येथेही त्याच पद्धतीचा अवलंब करण्यात आला. गावात यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही शेजारी उभारण्यात आला. दोन्ही पुतळ्यांना अधिकृत परवानगी नसल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ग्रामस्थांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेण्यात आल्या. पुतळ्यांना कायदेशीर परवानगी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी स्वतः पुढे येत दोन्ही पुतळे हटवले.
या प्रक्रियेनुसार प्रथम अनधिकृत पुतळे स्थलांतरित करण्यात येतात आणि त्यानंतर आवश्यक परवानग्या घेऊन पुन्हा विधिवत स्थापना करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. मोडलिंबमध्येही त्याच पद्धतीनुसार पुढील 1 ते 2 महिन्यांत परवानग्या घेऊन पुतळ्यांची पुन्हा स्थापना केली जाणार आहे.
यापूर्वी अंजनगाव खेलोबा येथे झालेल्या वादानंतर प्रशासनाने थेट कारवाई करण्याऐवजी संवादातून मार्ग काढण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात ही पद्धत टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे.







