Fake Marriage पुणे, ता. ८ : मराठवाड्यातील अविवाहित तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या कथित टोळीचा मोठा भांडाफोड झाला असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी तरुणीने केलेल्या खुलाशामुळे खळबळ उडाली आहे. अनेक तरुणांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या तरुणीने, “मी स्वतःच्या इच्छेने नव्हे तर धमक्यांमुळे नऊ लग्ने केली,” असा दावा केला आहे. Fake Marriage
या प्रकरणातील आरोपी भारती गुमस्ते हिचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये तिने संपूर्ण प्रकारामागे चौघांचा दबाव असल्याचे सांगितले आहे. “माझे वडील नाहीत. घरी आई, बहिणी आणि भाऊ आहे. काही लोक माझ्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यांच्या भीतीमुळे मला वारंवार लग्न करावे लागले,” असे तिने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. Fake Marriage

भारतीच्या म्हणण्यानुसार, अर्चना पाटील, तिचा मुलगा सागर, तसेच गणेश अंदुरे आणि त्याची पत्नी राधा अंदुरे यांनी तिला सतत दबावाखाली ठेवले. “त्यांनी सांगितलेल्या तरुणांशी लग्न केले नाही, तर भावाचा खून करू,” अशी धमकी दिली जात होती. त्यामुळे भीतीपोटी आपण हे सर्व करत राहिलो, असा दावा तिने केला. तिने पुढे सांगितले की, “लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी हेच लोक मला परत घेऊन जायचे आणि पुन्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न लावून द्यायचे. मला हे थांबवायचे होते, पण कोणीच ऐकत नव्हते.” अनेकदा नवऱ्याकडील कुटुंबियांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केल्याचेही तिने म्हटले आहे. Fake Marriage
दरम्यान, नवव्या लग्नानंतर तिच्या पतीला तिचा सोशल मीडिया अकाउंट सापडला. त्यानंतर त्याने चौकशी केल्यावर तिने संपूर्ण प्रकार उघड केला आणि यानंतर कथित “लुटारू नवरी” टोळीचा पर्दाफाश झाला. या प्रकरणामुळे मराठवाड्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे. या टोळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.






