Crime News: नालासोपारा : वसई-विरार परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून, किरकोळ वादातून एका भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची कोयत्याने हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा पूर्वेतील टाकीपाडा भागातील सर्वोदय वसाहतीतील साईधाम वेल्फेअर चाळीत मंगळवारी पहाटे ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया कानडे (वय 35) या आपल्या आईसोबत राहत होत्या. त्यांचे पती गावी गेले असल्याने घरात त्या, त्यांची आई आणि भाऊ अजित मालुष्टे (वय 40) हे तिघेच होते. मंगळवारी पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास बहीण आणि भावामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. हा वाद अचानक वाढला आणि रागाच्या भरात अजित याने घरात असलेला कोयता उचलून सुप्रिया यांच्या मानेवर आणि छातीवर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हा प्रकार पाहून त्यांची आई मध्ये पडून भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र संतापलेल्या अजित याने आईवरही हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपी काही दिवसांपासून मानसिक तणावात होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.







