कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (13 नोव्हेंबर) तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांना महत्त्वाची जबाबदारी दिली. टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मोईत्रा यांची पश्चिम बंगालच्या कृष्णानगर (नदिया उत्तर) जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
कृष्णानगर मतदारसंघाच्या खासदार महुआ मोइत्रा यांना टीएमसीने ही जबाबदारी दिली आहे, जेव्हा त्या लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांनी घेरल्या आहेत. अलीकडेच लोकसभेच्या एथिक्स कमिटीने त्यांचे निलंबन करण्याची शिफारस केली आहे.
एथिक्स कमिटीने आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केला आहे. यानंतर महुआ मोईत्रा यांनी पुढची लोकसभा निवडणूक अधिक मतांनी जिंकणार असल्याचे सांगितले होते.
काय म्हणाल्या महुआ मोईत्रा?
ममता बॅनर्जी यांना जिल्हाध्यक्ष बनवल्याबद्दल मोईत्रा यांनी आभार मानले. त्यांनी X सोशल मीडियावर लिहिले की, “कृष्णानगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल ममता बॅनर्जी आणि टीएमसीचे आभार. कृष्णानगरच्या जनतेसाठी मी सदैव पक्षासोबत काम करेन. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत पक्ष व्यस्त असताना टीएमसीने संघटनेत हे फेरबदल केले आहेत.
Thank you @MamataOfficial and @AITCofficial for appointing me District President of Krishnanagar (Nadia North) .
Will always work with the party for the people of Krishnanagar.— Mahua Moitra (@MahuaMoitra) November 13, 2023
दरम्यान प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपानंतर टीएमसी महुआ मोइत्राचा थेट बचाव करण्याचे टाळत आहे. परंतु, नुकतेच अभिषेक बॅनर्जी यांनी मोईत्रा स्वतःचा बचाव करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे सांगितले होते. एथिक्स कमिटीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले, त्यांच्याकडे पुरावे नसतील तर ते हकालपट्टीची शिफारस कशी करू शकतात? हे दुसरे तिसरे काही नसून सूडाचे राजकारण आहे.