नवी दिल्ली: मध्य प्रदेशात काँग्रेसच्या पराभवानंतर हायकमांड अॅक्शन मोडमध्ये आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हायकमांडने कमलनाथ यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. सध्या हायकमांड मोठी कारवाई करण्याचा विचार करत असल्याचे दिसत आहे. कमलनाथ यांनी भाजपच्या शिवराजसिंह चौहानसारखी सक्रियता दाखवली नाही, असे हायकमांडला वाटते. पक्षाने कमलनाथ यांना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून घोषित केले होते. हायकमांडने त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते, पण निकाल अजिबात काँग्रेसच्या बाजूने गेला नाही.
भाजपने रविवारी मध्य प्रदेश विधानसभेत 230 पैकी 163 जागा जिंकून दोन तृतीयांश बहुमत मिळवले, तर काँग्रेस 66 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. आता पक्षाचे हायकमांड अॅक्शन मोडमध्ये आले असून वृत्तानुसार, कमलनाथ यांना मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास हायकमांडकडून सांगण्यात आले आहे.
वास्तविक, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू पीसीसी प्रमुख कमलनाथ राहिले. त्यामुळे काँग्रेसचेही नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. याशिवाय इतर अनेक राजकीय अर्थही त्यातून काढले जात आहेत. कमलनाथ आपली जागा वाचवण्यात यशस्वी झाले असले तरी प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
कमलनाथ यांचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या महाकौशलमध्येही भाजपने यावेळी जोरदार कामगिरी केली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही काँग्रेसने छिंदवाडा जिल्ह्यात कमलनाथ यांच्या प्रभावाखाली सर्व 7 जागा जिंकण्यात यश मिळविले असले, तरी महाकौशलमधील 8 जागांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
जबलपूर, छिंदवाडा, बालाघाट, सिवनी, नरसिंहपूर, मंडला, दिंडोरी आणि कटनी जिल्हे मध्य प्रदेशातील महाकौशल भागात येतात. या 8 जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या एकूण 38 जागा असून, या निवडणुकीत भाजपचे २१ उमेदवार विजयी होऊन आमदार झाले आहेत. पीसीसी प्रमुख कमलनाथ यांच्यासह काँग्रेसचे १७ उमेदवार विजयी झाले आहेत. कमलनाथ सरकारमध्ये अर्थमंत्री तरुण भानोत आणि विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांच्यासह विधानसभेच्या उपसभापती हिना कानवरे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.