बरेली: उत्तर प्रदेशमध्ये लग्नाच्या बहाण्याने महिला पोलिसांवर बलात्कार करणाऱ्या एका नराधम आरोपीला बरेली पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या पाच वर्षांत या आरोपीने लग्नाच्या बहाण्याने दहाहून अधिक महिला पोलिसांवर बलात्कार करून फसवणूक केली आहे. या कालावधीत या भामट्याने सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. राजन वर्मा असे आरोपीचे नाव असून तो लखीमपूरचा रहिवासी आहे. हा बदमाश पेठा बनवण्याचा कारखाना चालवतो.
लखीमपूर खेरी, श्रावस्ती आणि मुरादाबादमध्ये आतापर्यंत सहा महिला पोलिसांनी सदर आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर, या आरोपीने स्वतः 10 हून अधिक घटनांची कबुली दिली आहे. या आरोपीच्या अटकेबाबत बरेलीचे अतिरिक्त एसपी राहुल भाटी यांनी पत्रकार परिषद घेतली. फक्त आठवीपर्यंत शिकलेला हा आरोपी खूप हुशार असल्याचं त्यांनी सांगितलं. सुमारे पाच वर्षांपूर्वी आरोपीने पोलीस भरतीत सहभाग घेतला होता. त्यावेळी भरती होण्यासाठी एका व्यक्तीला पैसेही दिले होते, मात्र तो भरती होऊ शकला नाही.
लग्नाच्या बहाण्याने केला बलात्कार
तेव्हापासून आरोपीने अनोख्या पद्धतीने गुन्हे करण्यास सुरुवात केली. यासाठी त्याने पोलिसांचा युनिफॉर्म शिवून घेतला. त्या युनिफॉर्ममध्ये अनेक फोटोज काढले. त्यानंतर महिला पोलिसांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. हा आरोपी पोलिसांच्या वेबसाइटवरून महिला पोलिसांची माहिती काढायचा आणि नंतर त्यांचा विश्वास जिंकायचा आणि लग्नाचे आमिष दाखवत फसवणूक आणि बलात्काराचे गुन्हे करत असे.
अयोध्येत एका महिला कॉन्स्टेबलशी लग्न
आरोपीने स्वतःला पोलीस असल्याचे सांगितल्याने पीडित पोलीस महिला सहज बळी ठरली. या आरोपीवर आतापर्यंत सहा महिला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एसपी सिटीच्या म्हणण्यानुसार, या नराधमाने अयोध्या पोलिस लाइन्समध्ये तैनात असलेल्या महिला पोलिसावर बलात्कार केला होता. प्रकरणाला गती आल्याचे पाहून आरोपीने पीडितेसोबत लग्न केले. मात्र, नंतर जेव्हा पीडितेला आरोपीचे वास्तव समजले, तेव्हा तिने स्वतःला आरोपीपासून दूर केले.