नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘इंडिया अलायन्स’ला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमीका घेत लोकसभा निवडणूक एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसने आमचा प्रस्ताव धुडकावून लावला, त्यामुळे आम्ही एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने लोकसभा निवडणूक लढवू. आम्ही दिलेले सर्व प्रस्ताव काँग्रेसने धुडकावून लावले. माझा प्रस्ताव मान्य झाला नाही, त्यामुळे आता आम्ही एकटेच निवडणूक लढवू.” त्या पुढे म्हणाल्या की, ‘राहुल गांधींची न्याय यात्रा पश्चिम बंगालमधून जाणार आहे, आम्ही इंडिया आघाडीत असूनही आम्हाला त्याची माहिती देण्यात आली नाही. आमचा पक्ष एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहे.’ त्यामुळे, आता ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालच्या सर्व ४२ जागांवर एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणार आहे.
भजापची टीका
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या घोषणेवर भाजप नेते गिरिराज सिं यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, हे लोक पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी एकत्र आले होते. मात्र या अहंकारी अलायन्समध्ये सर्वांनाच पंतप्रधान व्हायचे आहे. याशिवाय काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचे लक्ष्य भाजप नसून काँग्रेस आहे. इंडिया अलायन्सचे नेते मनाने एक नाहीत.
जागा वाटपावर चर्चा
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, ममता बॅनर्जी यांना काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा करायची होती. त्यांनी काँग्रेसला दोन जागांची ऑफर दिली होती. काँग्रेसने अनेकवेळा 10-12 जागांची मागणी केली होती. ममता बॅनर्जी यांना काँग्रेसला 10-12 जागे देण शक्य नाही. पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर त्या भाजपला हरवू शकतात. असे त्यांनी आधीही सांगितले होते.
प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यावरून टीएमसी आणि ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. मंगळवारी अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना संधीसाधू संबोधले आणि काँग्रेस त्यांच्या दयेवर निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी अधीर रंजन चौधरी यांची टीका फेटाळून लावली असून अशा टिप्पण्यांमुळे काही फरक पडणार नाही, असे सांगितले.