नवी दिल्ली: आज (दि. ७) सकाळी लष्कराने ऑपरेशन सिंदूरबाबत पत्रकार परिषद घेतली. तेव्हा दोन महिला अधिकाऱ्यांनी सर्वात जास्त लक्ष वेधले, त्यापैकी एक विंग कमांडर व्योमिका सिंग होत्या, ज्या हवाई दलात कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत लष्कराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी होत्या. विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत आणि त्यांची सर्वत्र चर्चा का होत आहे? ते जाणून घेऊया.
अडीच हजार तासांचे उड्डाण
व्योमिका सिंग ही काही सामान्य पायलट नाहीये. त्या एक अनुभवी हेलिकॉप्टर पायलट आहे, ज्यांना २५०० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्येकडील कठीण डोंगराळ प्रदेशात अनेक कारवाया केल्या आहेत. त्या उंच पर्वतीय भागात उड्डाण करण्यात एक्स्पर्ट आहेत.
बचाव मोहिमांपासून ते पर्वतारोहणापर्यंत
व्योमिका यांनी अनेक मोठ्या मदत आणि बचाव मोहिमांचे नेतृत्व केले आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये, अरुणाचल प्रदेशातील आपत्तीदरम्यान त्यांनी लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. एवढेच नाही, तर २०२१ मध्ये त्यांनी २१,६५० फूट उंच ‘माउंट मणिरंग’ शिखर जिंकले. त्या त्रि-सेवेतील महिलांच्या पर्वतीय मोहिमेचा भाग होत्या. त्यांच्या कामासाठी आणि कठोर परिश्रमासाठी, त्यांना हवाई दल प्रमुख आणि एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सन्मान देखील मिळाले आहेत.
पायलट होण्याचे स्वप्न
व्योमिका यांनी एका मुलाखतीत पायलट होण्याची कहाणी सांगितली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या, “मी सहावीत असताना एके दिवशी शाळेत नावांच्या अर्थावर चर्चा होत होती. मी त्यांना सांगितले की, माझ्या नावाचा अर्थ ‘व्योम’ म्हणजे आकाश आहे. मग वर्गाच्या मागून कोणीतरी म्हटले, तर तू आकाशाचा मालक आहेस, तू ‘व्योमिका’ आहेस. माझ्या वर्गशिक्षिकेनेही म्हटले होते की, एके दिवशी मी आकाशावर राज्य करेन, मी पायलट होईन. आणि त्या दिवसापासून माझ्या मनात हे होते की, मला पायलट व्हायचे आहे.”
व्योमिका पुढे म्हणाल्या की, “१९९१-९२ पर्यंत, हवाई दलात महिला वैमानिक नव्हत्या. त्यावेळी मला वाटायचे की, जर कोणी कुठेही वैमानिक बनू शकते तर ते फक्त हवाई दलातच आहे. मी रोजगार समाचार वाचायची, ज्यामध्ये रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित केल्या जात असे. एकदा मी पाहिले की, त्यावर लिहिले होते ‘फक्त अविवाहित पुरुष उमेदवार’. हे वाचून मी थोडी निराश झाले. पण जेव्हा मी अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात होते, तेव्हा मला कळले की UPSC द्वारे हवाई दलात भरती होऊ शकते. मी फॉर्म भरला, निवड झाली आणि मग तो दिवस आला जेव्हा मला विंग्स देण्यात आले आणि मी हेलिकॉप्टर पायलट बनले.”
ऑपरेशन सिंदूरबद्दल कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की, ही कारवाई पहाटे १.०५ ते १.३० च्या दरम्यान झाली आणि पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या पर्यटकांसाठी ही कारवाई करण्यात आली. गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी निर्माण केले जात आहेत आणि या कारवाईअंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमध्ये 9 लक्ष्ये ओळखण्यात आली, जी नष्ट करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. लाँचपॅड आणि प्रशिक्षण केंद्रांना लक्ष्य करण्यात आले.