फरिदाबाद : तुमच्या आमच्याकडे दूधवाला दुचाकीवर येतो. एखाद्याचा फारच मोठा व्याप असेल, गिऱ्हाईक जास्त असतील, तर तो पिकअपने दूध वाटत असेल. परंतु, हरियाणाच्या फरिदाबादमध्ये एक दूधवाला चक्क ५५ लाखांच्या महागड्या ऑडी ए-३ कॅब्रियोलेट गाडीत दूध वाटप करतो.
अमित भडाना असे या ३३ वर्षीय दूधवाल्याचे नाव आहे. फरिबादच्या मोहताबाद गावचा रहिवासी असलेला अमित दररोज १२० लीटर दूध घरोघरी जाऊन पोहोचवतो. यासाठी त्याला ६० किमीचा प्रवास करावा लागतो आणि हे काम तो ऑडीतून करतो. ऑडीतून आलेल्या दूधवाल्याला पाहून अनेकांना त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. दररोज दूध वाटण्यासाठी अमितला ४०० रुपयांचे पेट्रोल लागते.
या ऑडी ए-३ केंब्रियालेट गाडीची किंमत ५२ ते ५९ लाखांच्या दरम्यान आहे. अमित यापूर्वी ८ लाख रुपयांच्या हार्ले डेव्हिडसन दुचाकीवरुन दूध वाटायचा. उन्हाची तीव्रता वाढल्याने दुचाकीवरून दूध वाटप शक्य नसल्यामुळे चारचाकी घेतल्याचे अमितने सांगितले. महागड्या गाड्यांची मला हौस आहे. दुधाच्या व्यवसायात मला ही हौस पूर्ण करता येते, असे अमितचे म्हणणे आहे.
तो त्याच्या उत्पन्नाबाबत मात्र काहीही सांगत नाही. अमितचे पदवीचे शिक्षण झाले असून तो एका खासगी बँकेत नोकरीला होता. परंतु, चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्याने घरच्या डेअरी व्यवसायात हातभार लावण्याचा निर्णय घेतला. भडाना कुटुंबीयांकडे ३२ गायी आणि ६ म्हशी आहेत. संपूर्ण कुटुंबीयच दुधाच्या व्यवसायात आहे.