चंदीगड: चंदीगड विमानतळावर अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतला थप्पड मारल्याची बातमी समोर येत आहे. कथितरित्या एका सीआयएसएफ महिला कॉन्स्टेबलने तिला थप्पड मारली. कंगना चंदीगडहून दिल्लीला येत होती. विमानतळावर फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी चेकिंग दरम्यान तिला कुलविंदर कौर नावाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याने थप्पड मारली.
वृत्त लिहिपर्यंत कंगना दिल्ली विमानतळावर उतरली होती. दिल्लीत सीआयएसएफच्या महासंचालक नयना सिंह यांच्यासमोर कंगनाने या संपूर्ण घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. चेकिंग दरम्यान आपल्यावर हल्ला झाल्याचे तिने सांगितले आहे. विमानतळावर पडद्यामागे ज्या ठिकाणी महिलांची तपासणी केली जाते, त्या ठिकाणी हा हल्ला झाला. कंगनाने या संपूर्ण घटनेवर कारवाईची मागणी केली आहे.
ताज्या माहितीनुसार, आरोपी महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून तिची चौकशी करण्यात येत आहे. तसेच चंदीगड विमानतळावरील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. कंगनाला थप्पड मारल्याच्या घटनेवर हिमाचलचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. जय राम ठाकूर म्हणाले की, ‘कोणालाही हात उचलण्याचा अधिकार नाही.’
कंगना राणावतने अलीकडेच राजकारणात प्रवेश केला आहे. भाजपने तिला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून तिकीट दिले होते. निवडणुकीत काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांचा पराभव करून कंगना पहिल्यांदाच खासदार बनली आहे. विक्रमादित्य हे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा आहे. निवडणूक जिंकल्यानंतर ती दिल्लीत येत होती, त्यावेळी तिच्यावर हल्ला करण्यात आला.
Shocking rise in terror and violence in Punjab…. pic.twitter.com/7aefpp4blQ
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) June 6, 2024
या संपूर्ण घटनेनंतर कंगनाची प्रतिक्रिया समोर आली आहे. आता कंगना राणावत हिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने नेमके काय घडले हे देखील व्हिडीओमध्ये स्पष्ट सांगितले आहे. तसेच आपण सुरक्षित असल्याचे कंगना राणावतने म्हटले. एवढंच नाही तर आपल्या कानाखाली मारण्यात आल्याचीही कबुली कंगनाने दिली आहे.