Israel And Hamas War : नवी दिल्ली : इस्रायली लष्कराने गाझाच्या सर्वात मोठय़ा शिफा या रुग्णालयाला वेढा घातला आहे. शिफा रुग्णालयास ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी मुख्य केंद्र बनवल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हे दहशतवादी तेथील नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करीत आहेत. तसेच या रुग्णालयाखाली त्यांनी भुयारी अड्डे (बंकर) केले आहेत, असेही इस्रायलचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम म्हणून शनिवारी विद्युत जनित्रातील इंधन संपल्याने मुदतपूर्व जन्मलेल्या अर्भकासह पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांत उत्तर गाझा युद्धक्षेत्रातील शिफा आणि इतर रुग्णालयांजवळ तीव्र संघर्ष सुरू आहे. त्यामुळे जीवनावश्यक गोष्टींचा साठा संपत आला आहे. रुग्णालयांतील वीजपुरवठाही ठप्प झाला आहे. उपचारासाठी लागणारी उपकरणेही बंद पडली आहेत. वैद्यकीय उपकरणे बंद पडल्याने रुग्ण, विशेषत: अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे.
इस्रायली सैनिक रुग्णालयाच्या बाहेर-आत गोळीबार करत होते. त्यांनी या परिसरातील आणि इमारतींमधील रूग्णांचा वावर रोखला होता. मात्र इस्रायली सैनिकांनीच गोळीबार करत होते का हे कळू शकलेलं नाही. रुग्णालयातली यंत्रणा बंद पडल्याने पाच रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. त्यात एका अकाली जन्मलेल्या अर्भकाचाही समावेश आहे. या रुग्णालयात ३७ अर्भकांवर उपचार सुरू होते. नागरिकांच्या कोणत्याही नुकसानास ‘हमास’च जबाबदार आहे. दहशतवादी गट ‘हमास’ गाझामधील नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत असल्याच्या आरोप करण्यात आला.
‘हमास’ने इस्रायलवर चढवलेल्या हल्ल्यात सुमारे १२०० इस्रायली नागरिक ठार आहेत. तर, इस्रायलने प्रत्युत्तरादाखल चढवलेल्या हल्ल्यात गाझा येथील ११ हजारांवर पॅलेस्टिनी नागरिक मृत्युमुखी पडले. त्यात प्रामुख्याने नागरिक असून मुलांची संख्या लक्षणीय असल्याची माहिती ‘हमास’संचालित सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.