दुबई : भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सामना पार पडला असून यामध्ये भारतीय महिला संघाने बाजी नमारली आहे. भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत ६ गडी राखून शानदार विजय मिळवला आहे. हा भारताचा या स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला आहे.
दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तानचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. कारण भारताच्या गोंलदाजांनी शानदार सुरुवात करत पहिल्याच षटकात पाकिस्तानला मोठा धक्का दिला. पाकिस्तानची सलामीवीर फलंदाज फेरोजा शून्यावर माघारी परतली. त्यानंतर मुनीबा अलीने १७ धावा केल्या. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना निदा दारने सर्वाधि २८ धावांची खेळी केली. इतर कुठल्याही फलंदाजाला मैदानावर टिकाव धरता आला नाही. पाकिस्तानला २० षटकअखेर ८ गडी बाद करत अवघ्या १०५ धावाच करता आल्या.
हरमनप्रीत कौरची यशस्वी झुंज..
गेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना ढेपाळलेल्या भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १०६ धावाच करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना शेफाली वर्माने शानदार सुरुवात करुन देत ३२ धावांची खेळी केली. तर स्मृती मंधाना ७ धावा करत बाद झाली. जेमीमा रॉड्रीग्जने २३ धावा करत मधल्या षटकांमध्ये धाव फलक हलता ठेवला. कर्णधार हरमनप्रीत कौरने २९ धावांची खेळी केली. मात्र तिला शेवटी मैदान सोडून रिटायर्ड होऊन बाहेर जावं लागलं. शेवटी सजिवन सजनाने चौकार मारत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.